खेड्यांमधून एआय साधनांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामाला शिक्षणाचीही जोड

Woman leaning against a pole, looking at her phone in a group of women

खराडी, महाराष्ट्र, भारत – दिवसभर काम केल्यानंतरही रात्री १०.३० वाजता बेबी राजाराम बोकालेह्यांना झोपण्यापूर्वी आणखी एक काम पूर्ण करायचे आहे.

त्या त्यांच्या पलंगावर मांडी घालून बसतात. एका कोपऱ्यात हिंदू धर्मात आराध्य मानल्या गेलेल्या कृष्णाचे मंदिर दिव्यांच्या रंगीत माळांनी उजळले आहे. भल्यामोठ्या करड्या मिशा आणि आरपार जाणारी नजर असलेल्या त्यांच्या दिवंगत पतीचे रेखाचित्र पलंगाच्या वरच्या बाजूला लावलेले आहे.

त्या त्यांच्या स्मार्टफोनमधील एक अॅप उघडतात आणि स्पष्ट, नादमय आवाजात मोठ्याने एक कथा वाचायला लागतात. ही कथा त्यांच्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत आहे. त्या महाराष्ट्रात राहतात, तेथे हीच भाषा बोलली जाते. पुणे शहरालगतच्या गजबजलेल्या खराडी उपनगरात त्या राहतात.

बोकालेह्यांचा आवाज अन्य काही जणांच्या आवांजासोबत मराठीतील एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी वापरला जाणार आहे. मात्र, त्याच वेळी त्याही स्वत:साठी मोलाचे शिक्षण घेत आहेत. सध्या हे शिक्षण वैयक्तिक वित्तीय व्यवस्थापन अर्थात पर्सनल फायनान्सबाबत आहे. त्या जी गोष्ट वाचत आहेत, ती मनोरंजक मार्गाने व्यवहार्य माहिती देण्याच्या उद्देशाने रचण्यात आली आहे. बँकांचे कामकाज कसे चालते, बचत कशी करावी, लबाड्या आणि फसवणुकी कशा टाळाव्यात ह्याबद्दल ती कथा आहे.

“आता मी माझ्या स्मार्टफोनच्या मदतीने आणखी मजेशीर गोष्टी करू शकते,” त्या सांगतात. खरेदी केलेल्या वस्तूंसाठी, भारतातील यूपीआय पेमेंट प्रणालीद्वारे  पैसे चुकते करण्यास त्या शिकल्या आहेत. बँकिंगसह अन्य काही गोष्टी फोनद्वारे कशा करायच्या हेही त्या शिकल्या आहेत.

A woman sitting on a bed, looking at her smartphone
बेबी राजाराम बोकाले त्यांच्या फोनमधील कार्य अॅपमध्ये मराठी गोष्ट वाचत आहेत. छायाचित्र- ख्रिस वेल्श, मायक्रोसॉफ्टसाठी
A woman’s hands holding a smartphone
बेबी राजाराम बोकाले कार्य अॅपचा वापर करून, महाराष्ट्र राज्यातील भाषा मराठीमध्ये लिहितात आणि वाचतात. छायाचित्र- ख्रिस वेल्श, मायक्रोसॉफ्टसाठी

बोकाले कार्य नावाच्या एका सामाजिक प्रभाव (सोशल इम्पॅक्ट) कंपनीत काम करतात. कार्य हा संस्कृत शब्द असून, ‘व्यक्तीला प्रतिष्ठा देणारे काम’ असा त्याचा अर्थ होतो. कार्य ही कंपनी स्वत:चे वर्णन ‘जगातील अग्रगण्य एथिकल डेटा कंपनी’ असे करते.

“कमवा, शिका आणि मोठे व्हा” हा ‘कार्य’चा मूलमंत्र आहे. भारतात आणि अन्यत्र कोठेही डेटासेट्स निर्माण करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती आणण्याची कंपनीची इच्छा आहे. शक्य तेवढ्या लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढणे आणि त्याच वेळी त्यांना आधुनिक डिजिटल अर्थव्यवस्थेत जोमाने वाढण्यासाठी साधने पुरवणे हे ह्या समूहाचे उद्दिष्ट आहे. त्याचवेळी कार्य ही कंपनी अपारंपरिक मनुष्यबळ साथीला घेऊन उच्च दर्जाचे आणि नीतीमत्तापूर्ण डेटासेट्स उभारण्याचे कामही करत आहे.

हे डेटासेट्स मौलाचे आहेत. मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या ८ कोटी असली, तरी डिजिटल विश्वात ह्या भाषेला पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. भारतात जर एखाद्या व्यक्तीला हिंदी किंवा इंग्रज येत नसेल, तर अॅप्स, साधने व डिजिटल असिस्टण्ट्स ह्यांसारखी लोकांसाठी उपयुक्त तंत्रज्ञाने वापरणे कठीण होऊन जाते. इंग्रजी व हिंदी भाषा येणारे लोक ह्या तंत्रज्ञानांचा वापर गृहीत धरतात. ह्या तंत्रज्ञानांमध्ये कोट्यवधी ग्राहकांना लाभ देण्याची संभाव्यता आहे. म्हणूनच मायक्रोसॉफ्ट आणि अन्य कंपन्या ह्या ‘संसाधनांची कमतरता’ असलेल्या भाषांमध्ये आपली उत्पादने आणण्यासाठी हिरीरीने काम करत आहेत.

“माझा आवाज रेकॉर्ड होत आहे आणि माझ्या आवाजातून कोणी तरी मराठी शिकणार आहे ह्याचा मला खरोखरच खूप अभिमान वाटतो,’ असे ५३ वर्षीय बोकालेम्हणतात. ही साधने आणि सुविधा मराठी भाषेत उपलब्ध होतील ह्याचाही खूप अभिमान वाटत असल्याचे त्या सांगतात.

त्या घरातूनच मसाले व मिरची दळून देण्याचा छोटा व्यवसाय करतात. “ह्या रेकॉर्डिंगमधून माझी जी कमाई झाली, ती मी ग्राइंडर दुरुस्त करण्यासाठी आणि त्याचा एक भाग विकत घेण्यासाठी वापरली,” त्या सांगतात. ह्या कामांसाठी सहसा त्यांच्याकडे पैसे उरत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

कार्य: उच्च दर्जाच्या डेटाची निर्मिती आणि दारिद्र्य निर्मूलन

कार्य एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच संशोधनासाठी अनेक भारतीय भाषांमध्ये डेटासेट्स तयार करत आहे आणि ह्यातून अनेक भारतीयांसाठी, विशेषत: ग्रामीण भागातील भारतीयांसाठी, रोजगार निर्मिती होत आहे.

‘कार्य’ची सुरुवात २०१७ मध्ये मायक्रोसॉफ्ट रिसर्च प्रकल्प म्हणून झाली.

‘कार्य’मध्ये भारतातील अनेक भाषांतील उच्च दर्जाच्या भाषा डेटासेट्सची निर्मिती करण्याची प्रचंड संभाव्यता आहे हे कालांतराने स्पष्ट झाले. त्यामुळे शिक्षण व उत्पन्न ह्यांच्या माध्यमातून ग्रामीण भारतीयांना दारिद्र्यातून बाहेर काढून त्यांची उन्नती साधण्यात मदत होणार होती. हा प्रकल्प २०१२ मध्ये मायक्रोसॉफ्टमधून वेगळा काढण्यात आला आणि कार्य ही स्वतंत्र कंपनी स्थापन झाली. ‘कार्य’चे संपूर्ण ऑपरेशन हे मायक्रोसॉफ्ट अॅझ्युरवर आधारित आहे. ह्यामध्ये काम करणाऱ्या मदतनिसांना त्यांच्या स्थानिक भाषेत रेकॉर्डिंग करण्यासाठी तसेच लिहिण्यासाठी दिलेल्या अॅपचाही समावेश होतो. कार्य अॅझ्युर ओपन एआय सर्व्हिसचा तसेच डेटा वैध करून घेण्यासाठी अॅझ्युर एआय कॉग्निटिव सर्व्हिसेसचा उपयोग करते. कंपनीच्या प्रमुख क्लाएंट्समध्ये मायक्रोसॉफ्टचा समावेश होतो.

कार्य बोकालेह्यांच्यासारख्या मदतनिसांना प्रतितास ५ डॉलर्स एवढी रक्कम देते. भारतातील कमाल रोजंदारीहून ही रक्कम बरीच अधिक आहे. ११ दिवसांत बोकालेह्यांनी सुमारे पाच तास काम केले आणि २००० रुपये किंवा २५ डॉलर्स कमावले. हे काम रोचक आणि शैक्षणिक आहे (म्हणूनच ह्यात ‘शिका’ असेही नमूद केले आहे) तसेच ‘कार्य’च्या मदतनिसांना त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे स्वत:ची भरभराट करून घेता यावी म्हणून सातत्याने सहाय्य पुरवत राहण्याचा विचार ह्यामागे आहे. शिवाय, ‘कार्य’द्वारे निर्माण करण्यात आलेला डेटा पुन्हा विकण्यात आला, तर मदतनिसांनाही त्याची रॉयल्टी मिळणार आहे.

‘कार्य’च्या संस्थापकांनी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली आहेत. २०३० सालापर्यंत १० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने कंपनी २००हून अधिक विनानफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थांसोबत भागीदारी करत आहे. पुढे ह्याच लोकांना त्यांच्या स्वत:च्या भाषांमध्ये काम करण्यासाठी ही साधने उपयोगी पडतील अशा आशा ‘कार्य’ला वाटत आहे. लिंग तसेच अन्य घटकांवर आधारित पूर्वग्रह दूर करण्यासाठी हे डेटासेट्स जमवण्याचा व त्यावर प्रक्रिया करण्याचा ‘कार्य’चा प्रयत्न आहे. अधिक समावेशक डेटा उभा करण्यासाठी कार्य लोकांच्या वैविध्यपूर्ण समूहांपर्यंत जात आहे, त्यामागे हे कारण आहे.

मनू चोप्रा (२७) हे कंपनीच्या संस्थापकांपैकी एक आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही ते काम बघतात. ज्या भाषांवर अद्याप फारसे काम झालेले नाही, त्या भाषांतील डेटासेट्सना तुफान मागणी असल्याचे ते सांगतात. त्याचबरोबर ग्रामीण भारतातील ७८ टक्के लोकांना स्मार्टफोन उपलब्ध आहे हे तथ्य बघता, ह्या भागात अमाप संधी आहे. कर्मचाऱ्यांचे पगार व संशोधन कामांसाठी लागणारा खर्च झाल्यानंतर ‘कार्य’चा उर्वरित नफा मदतनिसांना दिला जातो. ह्याच उद्देशाने ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे.

Outside portrait of a man standing in a busy street
‘कार्य’चे सीईओ मनू चोप्रा भारतातील पुण्यालगतच्या खराडीमध्ये. छायाचित्र- ख्रिस वेल्श, मायक्रोसॉफ्टसाठी.

“जगात एआयच्या उभारणीसाठी ट्रिलियन डॉलर्स खर्च केले जात आहेत असे समजू,” चोप्रा सांगतात. “तर पुढील २० वर्षांत, त्याची किती टक्केवारी मी थेट ज्यांना त्याची खूप गरज आहे अशा लोकांच्या खिशात आणू शकतो? ग्रामीण भारत एआयची बांधणी उत्तमरित्या करू शकेल असे आम्हाला खरोखर वाटते. एवढेच नाही तर एआय तंत्रज्ञानांचा स्वीकारही हे लोक उत्कृष्ट पद्धतीने करू शकतील.”

भारताच्या २८ राज्यांपैकी २४ राज्यांतील गावे-खेड्यांमधील ३०,००० लोकांनी आत्तापर्यंत बोकालेकरत असलेले काम ‘कार्य’साठी केले आहे.

पुरेशी संसाधने नसलेल्या भाषांमध्ये तंत्रज्ञान अधिक प्रमाणात आणणे

ओपनएआयचे चॅटजीपीटी आणि मायक्रोसॉफ्टचे कोपायलट ह्यांसारखी एआय टूल्स इंग्रजी भाषेत उत्तम काम करतात, कारण, इंटरनेटवर इंग्रजी भाषेतील लेखी व श्राव्य स्वरूपातील साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. भारताची लोकसंख्या १.४ अब्ज आहे, देशात २२ अधिकृत भाषा आहेत, शेकडो अन्य भाषा आहेत आणि हजारो बोलीभाषा आहेत. सुमारे ६० टक्के भारतीय हिंदी भाषा बोलतात आणि सुमारे १० टक्के इंग्रजी भाषा बोलतात. त्यामुळे कोट्यवधी लोक डिजिटल साधनांच्या वापरापासून वंचित राहत आहेत. ही साधने त्यांना डिजिटल जगात जोमाने वाढण्यात खूप मदत करू शकतात.

“इंटरनेटवरील बहुतांश माहिती इंग्रजीत आहे ही स्थिती काही फार चांगली नाही. ही परिस्थिती आपल्याला सुधारावी लागेल, असे मला वाटते,” असे भाषा तंत्रज्ञ आणि मायक्रोसॉफ्टच्या बेंगळुरू येथील रिसर्च लॅबमधील संशोधक कलिका बाली सांगतात. ‘कार्य’ने संकलित केलेला डेटा त्या त्यांच्या संशोधनासाठी वापरतात.

“सर्वत्र पसरणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील वाढीत लोकांना सहभाग घेता आला पाहिजे. कोणालाही भाषेमुळे तंत्रज्ञान वापरता येत नाही असे होऊ नये,” त्या सांगतात.

Portrait of a woman smiling
मायक्रोसॉफ्टच्या भारतातील बेंगळुरू येथील रिसर्च लॅबमधील संशोधक तसेच भाषा तंत्रज्ञ कलिका बाली.  छायाचित्र- ख्रिस वेल्श, मायक्रोसॉफ्टसाठी

“आपल्याला संपूर्ण पृथ्वीवरील लोकांना सक्षम करायचे आहे असे आम्ही मायक्रोसॉफ्टमध्ये म्हणतो. आणि जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या तर इंग्रजीचा वापर करत नाही.”

एआयमुळे भाषांच्या जतनीकरण प्रक्रियेला वेग आला आहे आणि विशाल भाषा नमुन्यांमध्ये (एलएलएम) एआयचा वापर जलद गतीने होत आहे, असे बाली सांगतात. हे ऑनलाइन व एआय साधने तयार करण्यासाठी तर उपयुक्त आहेच, शिवाय, दुर्मीळ व अस्तंगत होत चाललेल्या भाषांच्या जतनीकरणासाठीही उपयुक्त आहे.

“आता आपण ह्या कोपायलटसारख्या गोष्टी खरोखर वेगाने करू शकत आहोत,” त्या सांगतात. “पूर्वी आपण भाषेच्या जतनीकरणाबद्दल बोलायचो तेव्हा अनेक दशके केलेल्या प्रयत्नांबद्दल आपण बोलायचो. आता हे सगळे अक्षरश: काही महिन्यांत केले जाऊ शकते. ”

२०२४ सालाच्या अखेरीपर्यंत १००,०००हून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात असल्याचे ‘कार्य’तर्फे सांगितले जात आहे. कामाची व शिक्षणाची गरज असलेल्यांच्या शोधात कंपनी आहे. ह्यामध्ये ग्रामीण भागातील स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. उत्तम वेतनासोबतच ह्यामध्ये प्रशिक्षणाचा समावेश आहे. त्याचबरोबर काम पूर्ण झाल्यानंतर कंपनीकडून सहाय्यही पुरवले जाते.

‘लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यात तंत्रज्ञान खरोखरच सहाय्यकारी’

दिल्लीतल्या अनधिकृत वसाहतीत अर्थात ‘बस्ती’मध्ये वाढलेल्या चोप्रा ह्यांच्या मते, लहानाचे मोठे होत असताना त्यांनी जो अन्याय बघितला त्याचा खोल परिणाम त्यांच्या जाणिवेवर झाला. कॅलिफोर्नियातील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत कम्प्युटर सायन्स शिकत असताना त्यांच्या शिक्षणाच्या उद्देशाच्या जाणिवेवर हा अन्याय बघितल्याचा प्रभाव खूप होता. 

“मी जेव्हा भारतात परत आलो तेव्हा कोठेही गेलो तरी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत होती. ती गोष्ट म्हणजे दारिद्र्यातून बाहेर येण्याची लोकांची धडपड किंवा तीव्र इच्छा. प्रत्येक जण खूप कष्ट करतो, प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असतो,” ते सांगतात. “आणि त्यांच्याकडे नवीन कौशल्ये शिकण्याची क्षमताही आहे. आणि जर ह्या दोन गोष्टी असतील, तर तंत्रज्ञान खरोखरच खूप उपयुक्त ठरू शकते. लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, स्वत:ची वाढ साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान त्यांना खूप मदत करू शकते.”

बोकाले ह्यांनी ११ दिवसांत जे काम केले तो एका प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाचा भाग होता. डेटा निर्माण करण्याच्या कामासोबत उपयुक्त माहिती देणे शक्य होते का, याची चाचपणी करारा तो प्रयोग होता. त्यांच्यासाठी भरघोस वाटणारी रक्कम कमावतानाच, त्यांना आर्थिक साधनांचेही शिक्षण मिळत होते. त्या ह्या शिक्षणाचा उत्तम वापर करू शकतात.

त्यांना देण्यात आलेले साहित्य म्हणजे दोन बहिणींची अनेक भागांतील कथा होती. ही कथा मदतनीस त्यांच्या स्मार्टफोनवर मोठ्याने वाचतात आणि त्यांचा आवाज तसेच बोली मराठीचे नाद टिपले जातात.  “आम्हाला गोष्ट खरोखरच खूप आवडली,” बोकालेसांगतात. “त्या कथेमध्ये सामान्य लोक आहेत. ते दररोज खूप कष्ट करतात. त्यांनी कमावलेला पैसा सहज खर्च होऊन जातो, ते कोणतीही बचत करू शकत नाहीत. थोडक्यात बचत कशी करायची हा त्यांच्यापुढे प्रश्न असतो.

”कथेचा आकृतीबंध खूपच यशस्वी ठरला आहे. अनेक सहभागी सदस्य त्यांच्या कुटुंबियांना व मित्रमंडळींनाही ही गोष्ट वाचून दाखवतात, असे ‘कार्य’च्या प्रमुख प्रभाव अधिकारी साफिया हुसेन ह्यांनी सांगितले.

Outside portrait of a girl smiling in a field
‘कार्य’च्या प्रमुख प्रभाव अधिकारी साफिया हुसेन. छायाचित्र- ख्रिस वेल्श, मायक्रोसॉफ्टसाठी

“ते म्हणतात की, मी आता एक काम करणार आहे आणि तुम्हाला गोष्टही वाचून दाखवणार आहे,” हुसेन सांगतात. “आणि ते खरोखरीच रोमांचित होतात, विचारात पडतात, ‘अरे, आता पुढे काय होणार आहे? तिला कर्ज कसे मिळेल? किंवा लग्नाचा खर्च करण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे असतील ना?’”

काम व शिक्षण ह्यांचा मेळ घालून आपल्या मदतनिसांना आदराची वागणूक देण्याचा व त्यांच्यासाठी उत्पन्नाच्या पलीकडील अर्थपूर्ण निष्पत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न ‘कार्य’ करत आहे, असे त्या सांगतात. “आम्ही लोकांना ते देत असलेल्या वेळाचा पैसा देत आहोत आणि ते जे काही करत आहेत, त्याला मूल्य देण्याची प्रयत्न आम्ही करत आहोत,” असे त्या नमूद करतात. “हे केवळ काम नाही, तुमच्या फावल्या वेळात तुम्हाला काही शिकण्याचीही संधी आहे.”

पुढे ‘कार्य’च्या कामगारांपैकी बरेच जण कंपनीत वेगवेगळ्या भूमिका निभावी शकतील, संघटक तसेच स्थानिक प्रशासक म्हणून काम करू शकतील अशी आशा हुसेन व्यक्त करतात. व्यापक विचार करता, तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले करण्याचेच उद्दिष्ट आमच्यापुढे आहे, असे त्या सांगतात.

“आम्ही मराठीसारख्या वेगवेगळ्या भाषांमध्ये डेटा संकलित करत असतानाच, तंत्रज्ञानाच्या क्रांतीमध्ये ही भाषा बोलणाऱ्या समुदायांमधील लक्षावधी लोक त्यापासून दूर जाऊ नयेत हा आमचा प्रयत्न आहे,” असे त्या सांगतात.

संपूर्ण समुदायाचा प्रकल्पात सहभाग

‘कार्य’च्या यशाची एक गुरूकिल्ली म्हणजे कंपनी संपूर्ण समुदायाला प्रकल्पामध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असते, असे मायक्रोसॉफ्टच्या संशोघक कलिका बाली सांगतात. ‘कार्य’च्या बहुतेक कामगार ह्या स्त्रिया आहेत. स्त्रियांना प्रगती करण्यासाठी पुरुषाच्या तुलने अधिक वर्तुळे पार करावी लागतात, ह्याकडे त्या लक्ष वेधतात.

“पुरुष सहसा केवळ दोन गोष्टी विचारतात: हे मला जमेल का आणि मला ह्याचे पैसे मिळतील का? स्त्रियांना जास्त प्रश्न विचारावे लागतात; माझ्या कुटुंबाला हे काम मान्य होईल का? ह्यामुळे माझ्या कुटुंबाचे आणि माझे नाव खराब तर होणार नाही? ह्यात माझे काही नुकसान तर होणार नाही? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर त्या कामाबद्दल आणि त्यातून मिळणाऱ्या पैशाबद्दल विचारतात,” असे त्या सांगतात.

“‘कार्य’सोबत काम करण्याचा फायदा म्हणजे कंपनीने तळागाळात एक विश्वास निर्माण केला आहे.  कंपनीचे प्रतिनिधी ज्या समुदायांसोबत राहतात, तेथेच कंपनी काम करते,” असे त्या सांगतात.

पुणे परिसरात बोकालेह्या सुपरिचित आहेत. त्यांना सगळे बेबीताई म्हणून ओळखतात. ताई म्हणजे ‘मोठी बहीण’. त्या एक अनौपचारिक संघटना चालवतात. त्यांत अनेक स्त्रिया महिन्याला काही रक्कम बाजूला टाकतात आणि आळीपाळीने ती सर्व रक्कम एका बाईला दिली जाते. एकरकमी पैसे मिळाल्यामुळे स्त्री तो छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी वापरू शकते. झाडाची सावली असलेल्या त्यांच्या अंगणात स्त्रिया अनेकदा कामाचे बोलण्यासाठी किंवा सहज गप्पा मारण्यासाठी एकत्र येतात. छोट्या अंगणात एका बाजूला एका टिनाच्या शेडमध्ये त्यांची मिरची-मसाला कुटण्याचे यंत्र आहे.

Three women sitting in on a step
डावीकडून, पार्वती केंबळे, सुरेखा संजय गायकवाड आणि बेबी राजाराम बोकाले, भारतातील पुण्यालगतच्या खराडीमध्ये, त्यांच्या स्वयंसहाय्यता बँकिंग गटात चर्चा करत आहेत.छायाचित्र- ख्रिस वेल्श, मायक्रोसॉफ्टसाठी

५१ वर्षांच्या सुरेखा संजय गायकवाड ह्या त्यांच्या शेजारी राहतात. त्या दोघींची मैत्री आहे. गायकवाड त्यांच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर किराणा मालाचे छोटे दुकान चालवतात. त्याही ‘कार्य’साठी फोनवरून मराठी वाचतात. बोकालेह्यांच्यासोबत त्यांच्या घराच्या पायऱ्यांवर बसलेल्या गायकवाड ह्यांना त्यांचा कामाबद्दलचा अनुभव विचारला असता त्यांच्या चेहऱ्यावर रुंद हास्य खुलले.

“मी घरी बसून असे काही करू शकेन ह्यावर माझा विश्वासच नव्हता,” त्या सांगतात. “मला पुन्हा बस घेऊन कुठे जावे लागत नाही. दिवसाच्या शेवटी मी घरी बसूनच हे काम करू शकते.”

ह्या कामातील शिक्षणाचा भाग म्हणजे जास्तीचा फायदा आहे, गायकवाड म्हणाल्या. बँकेत मुदतठेव कशी ठेवायची हे त्या ह्या गोष्टीतूनच शिकल्या आहेत आणि मुलाच्या कॉलेज शिक्षणासाठी अधिक पैसा साठवण्यासाठी त्यांनी नुकतीच मुदतठेव केलीही आहे.

अलीकडेच एका सकाळी ‘कार्य’साठी काम केलेल्या बऱ्याच स्त्रिया बोकालेह्यांच्या घरी गप्पा मारण्यासाठी थांबल्या. ५५ वर्षांच्या मीना जाधव ह्यांनी ह्या कामासाठी मिळालेले पैसे त्यांच्या शिवणकामाच्या उद्योगासाठी साहित्य व शिवणाची साधने खरेदी करण्यासाठी वापरला. त्यांनी विक्रीसाठी काही शर्ट्स शिवले. त्या काय शिकल्या असे विचारले असता, त्यांना आता बचतखाते वापरता येऊ लागले आहे आणि एटीएमही वापरता येऊ लागले आहे, असे त्या सांगतात. बँकेत न जाता पैसे भरता किंवा काढता येतात हे त्यांनी पूर्वी माहीत नव्हते.

आणखी एका स्त्रीने तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी बचतखाते सुरू करण्यासाठी पैशांचा उपयोग केला. त्याचप्रमाणे वाचलेल्या गोष्टींतूनच त्यांना बचतखाते कसे उघडायचे हे कळले.

काम करताना आनंद मिळाला आणि वित्तीय नियोजन व उपयुक्त ऑनलाइन साधनांबद्दल माहितीही मिळाली असे त्या सगळ्यांनीच सांगितले. स्मार्टफोन कसे वापरायचे हे कळल्यामुळे ह्या स्त्रियांसाठी अन्य अनेक संधीही खुल्या झाल्या हा आणखी एक लाभ आहे, असे बोकालेसांगतात. पायलट प्रकल्पात सहभागी झालेल्या अनेक स्त्रियांना त्यापूर्वी स्मार्टफोन कसा वापरायचा हेही माहीत नव्हते असे त्या सांगतात. “त्यांचे नवरे आणि सासू-सासरेही ‘तू किती नवीन गोष्टी शिकलीस’ असे म्हणून त्यांचे कौतुक करत आहेत आणि ही सर्वांत चांगली गोष्ट आहे,” असे बोकालेनमूद करतात.

बेबी राजाराम बोकाले त्यांच्या अनौपचारिक गुंतवणूक समूहातील अन्य स्त्रियांसोबत. स्मार्टफोन्समध्ये मराठी लिहून आणि रेकॉर्ड करून त्यांनी एआय भाषा मॉडेलच्या निर्मितीसाठी डेटासेट्स तयार करण्यात मदत केली आहे.